
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच प्रियकरानचे प्रेयसीसोबत भयंकर कृत्य
पार्किंगमध्ये फुललेल्या प्रेमाचा भयंकर शेवट, लग्नाच्या त्या खोट्या मेसेजमुळे फुटले बिंग, नक्की काय घडले?
छत्रपती संभाजीनगर – काल व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह शेतातील घरात पुरल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील संशयित प्रियकरास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण या घटनेमुळे शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
मोनिका सुमित निर्मळ असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी इरफान शेख पाशा याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोनिका छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत होती. पण ती जालना शहरातील जमुनानगर भागात राहत होती. मोनिकाचे लग्न झाले होते, पण ती पतीपासून विभक्त राहत होती. दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये -जा करत होती. रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे, याच पार्किंग वर काम करीत असलेल्या शेख याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या वर्षभरापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. पण ६ फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी परत आलीच नाही.तिचा मोबाईलही लागत नव्हता तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पण दोन दिवसानंतर मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातवाईकांना मी सुखरूप असून मी लग्न केले आहे.आता मी तुम्हाला एक वर्षांनंतरच भेटायला येईन, असा मेसेज आला, पण फोन बंद लागत होता. त्यानंतर पोलीसांनी छत्रपती संभाजीनगरमधील सीसीटीव्ही फुटेज आणि काॅल डिटेल्स तपासले असता शेखवर नजर ठेवण्यास सुरूवात केली. अखेर इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतले.त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मोनिकाला लासुर स्टेशन येथील आपल्या शेतात नेऊन तिथे हत्या करुन मृतदेह शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरल्याची कबुली दिली.
आरोपी शेखने त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचे समोर आले. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून याप्रकरणी जालना पोलीस पुढील तपास करीत आहेत.