
भयानक! दोघांवर हल्लेखोराकडून भररस्त्यात गोळीबार
गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर, एकाचा मृत्यू, हल्ल्यामागे दहशतवादी कनेक्शनचा संशय?
नांदेड – नांदेड शहरातील प्रसिद्ध गुरुद्वारा परिसर सोमवारी गोळीबारीच्या घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. आता या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
गुरमितसिंग सेवादार, रविंद्रसिंग राठोड अशी हल्ला झालेल्यांची नावे आहेत. या हल्ल्यात रविंद्रसिंग राठोड यांचा मृत्यू झाला आहे. जखमी असलेला गुरमितसिंग सेवादार हा खुनाच्या प्रकरणातील आरोपी आहे. २०१६ मध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हरविंदरसिंग संधू उर्फ रिंदा याचा भाऊ सत्येंद्रसिंग संधू याचा बाफना परिसरात खून झाला होता. गुरुमितसिंग सेवादार हा या प्रकरणात आरोपी असून तो जन्मठेपाची शिक्षा भोगत आहे. बारा दिवसांपूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपीने यावेळी चार ते पाच गोळ्या झाडल्या. तर एका भाविकाच्या चारचाकी वाहनातून एक गोळी आरपार गेली. घटनास्थळावर पोलिसांना गोळ्यांच्या तीन पुंगळ्या सापडल्या. गोळीबारानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाला. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, पोनि. उदय खंडेराय यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच परिसराची लगेच नाकाबंदी करण्यात आली. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात हल्लेखोर दुचाकीवरून जात असल्याचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे. नांदेडात रिंदा आणि माळी परिवारात गेल्या अनेक वर्षांपासून शत्रुत्व आहे. त्यामुळे बदल्याच्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.
दहशतवादी हरविंदरसिंग रिंदा याचा भाऊ सत्येंद्रसिंह उर्फ सत्या याचा २०१५ मध्ये खून झाला होता. या खून प्रकरणात काही जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात गुरमितसिंग सेवादारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यात तुरुंगातून तो ३० दिवसांच्या रजेवर नांदेडात आला होता.