शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने ठाण्यात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपीला जामीन देण्यात आला. यामुळे मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर यावेळी राज ठाकरेंनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. “या घटनेत आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्या पीडित मुलीचा पुन्हा जबाब नोंदवा आणि आरोपीला अटक करा” अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानतंर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांना चांगलंच सुनावलं. “माझं आताच पोलिसांशी बोलणं झालं. मी त्यांना हेच सांगितलं की बदलापूरसारखं सगळ्या गोष्टी तुम्ही अंगावर घेऊ नका. तो कोणत्या पक्षाचा आहे हे महत्वाचे नाही. कधी कुठल्या पक्षाची ही भूमिका नसते. जर आपण एखाद्या अशा माणसाची विकृती पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असू तर बघायलाच नको. तो कुठच्याही पक्षाचा असला तरी अशा कृत्यांना पाठीशी घालू नये”, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.“एखादा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्ट जामीन कसा मिळतो, हेच मला कळत नाही. त्यामुळेच मी सांगितलं की त्या मुलीचा जबाब परत घ्या. तो जो कोणी आरोपी आहे त्याला पुन्हा अटक करा”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.
ठाण्यातील भंडार आळीत एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याला अटक करण्यात आली. मात्र त्याची जामिनावर सुटकाही झाली. या घटनेनंतर आरोपीवर कडक कारवाई व्हावी, यासाठी मनसेसह ठाण्यातील जनतेने गुरुवारी मोर्चा काढला. ठाणे स्टेशन भंडार आळी ते मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध मंगळवारपर्यंत अतिरिक्त कलमे लावून कारवाई झाली नाही, तर प्रसंगी ठाणे बंदची हाक दिली जाईल असा इशारा मनसेनं दिला होता. त्यानंतर आज राज ठाकरेंनी आज प्रत्यक्ष ठाण्यात जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली.