
प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिबवेवाडी भागात 2 डिसेंबर 2023 रोजी दुपारी बाराच्या सुमारास क्रिकेट ग्राऊंड व निलसागर सोसायटी जवळ घडली. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून महिलेच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संग्राम हनुमंत साळुंके (वय 22, रा. वडकेनगर, बारामती, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन रेणुसे, आदित्य गवळी, अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध आयपीसी 364, 302, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुले रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संग्राम साळुंके याची धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याबाबत महिलेचा पती आरोपी नितीन रेणुसे याला माहिती मिळाली होती. संग्राम पत्नीला भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती नितीन रेणुसे याला मिळाली होती. संग्राम 2 डिसेंबर रोजी बिबवेवाडी येथील किया सर्व्हिस सेंटर येथे आला होता. आरोपींनी त्याच्यावर पाळत ठेवून गाठले. त्याला दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरातील गॅस गोदामाजवळ नेले. त्याठिकाणी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये संग्राम गंभीर जखमी झाला. त्याला तेथेच सोडून आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या संग्रामला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संग्रामच्या खुनामागचे कारण पोलिसांना समजू शकले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. वैद्यकीय अहवालात त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाले. तपासात संग्रामवर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ करत आहेत.