
कारवरील नियंत्रण सुटले अन् कार घुसली थेट हाॅटेलमध्ये
हाॅटेल अपघाताचा भयानक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, महिला वकीलाची चूक आणि....
बरेली – बरेली येथील रमाडा हॉटेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या बराच व्हायरल होत आहे. या हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराचे एका महिला कारचालकामुळे भयंकर नुकसान झाले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सुदैवाने जीवित हानी टळली आहे.
एक महिला वकील रमाडा हॉटेलमध्ये जेवायला आली होती. जेवण झाल्यानंतर तिने पार्किंगमधून तिची कार मागवली. कार आल्यानंतर ती त्यात बसली. नंतर हॉटेलच्या पोर्चमधून बाहेर पडत असताना तिने पुढे जाण्यासाठीचा गिअर टाकण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला. यामुळे गाडी अचानक मागे आली. अचानक हे घडल्यामुळे वकीलाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट हाॅटेलच्या आत घुसली. कार रमाडा हॉटेलचा काचेचा मुख्य दरवाजा तोडून आत घुसली. पोर्चमध्ये उभी असलेली माणसे आणि सुरक्षा रक्षक घाबरून दूर झाले, ज्यामुळे मोठा अपघात टळला. महिला वकिलाने आपली चूक कबूल केली असून तिने हॉटेलची नुकसानभरपाई करण्याचे मान्य केले. यामुळे हे प्रकरण मिटवण्यात आले असून हॉटेल प्रशासनाने नवी काच लावून घेत दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. पोलीसांनीही घातपाताच्या हेतून हे कृत्य केले नसून ही चुकीने झालेली गोष्ट असल्याचे म्हटले आहे. हाॅटेल प्रशासनानेही हे प्रकरण गंभीर नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान गाडी थोडीजरी अलीकडे आली असती तर चार ते पाच जणांचा हमखास जीव गेला असता पण केवळ नशिब बलवत्तर म्हणून सर्वजण वाचले आहेत. ही घटना शुक्रवारी घडल्याचे बोलले जात आहे.
हॉटेल मालक सौरभ मेल्होत्रा म्हणाले की, ही घटना योगायोगाने घडली. यात कोणालाही दुखापत झाली नाही. आम्हाला कोणतीही कारवाई नको आहे. पण हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज कसे लीक झाले याचा आम्ही शोध घेऊ असे सांगितले आहे.