
दारु पित जाऊ नका अशी मुलांनी दिली वडिलांना समज ; संतापलेल्या वडिलांनी केला मुलांवरच चाकू हल्ला, हडपसरमधील घटना
अनेकदा आई वडिल मुलांना दारु पिऊ नको, व्यसने करु नको, असे सांगताना दिसतात पण इथे उलटे घडले. दारु का पिता, दारु पित जाऊ नका, असे सांगणार्या दोन मुलांना वडिलांनी चाकूने वार करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत बिपिनकुमार किरण धुरिया (वय ३०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किरणकुमार रामेचत धुरिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना फिर्यादी यांच्या राहत्या घरी १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊरुळी देवाची येथील आदर्शनगरमध्ये फिर्यादी व त्याचे वडिल राहतात. फिर्यादी यांचा भाऊ विवेककुमार याने वडिलांना त्यांचे घरी जाऊन दारु का पिता, दारु पित जाऊ नका असे सांगितले. त्याचा राग येऊन वडिलांनी घरातील चाकू आणून फिर्यादीच्या भावाच्या डाव्या हातास मारला. फिर्यादी हे सोडविण्यासाठी गेले असताना त्यांच्याही डाव्या हाताच्या दंडावर चाकू मारुन जखमी केले. पोलीस हवालदार भोसले तपास करीत आहेत.