सतीश वाघ यांच्या हत्येची पत्नीनेच दिली होती सुपारी
उद्योजक सतीश वाघ प्रकरणात मोठा ट्विस्ट, गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
पुणे – पुण्यातील सतिश वाघ हत्या प्रकरणात मोठी घडामोड हाती आली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीने दिल्याची माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते.
सतीश वाघ यांची हत्या करणारा शेजारची व्यक्ती असल्याची आधी चर्चा होती. पण आता पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचे समोर येत आहे. सतीश वाघ हे उद्योजक होते. ते ९ डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. या दरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांचे जबरदस्ती अपहरण केले होते. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सतीश वाघ यांची अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून, ७२ वेळा वार करुन हत्या करण्यात आली होती. दरम्यान सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा पवन शर्मा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणातील इतरही फरार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे, संबंधित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला होता. या संपूर्ण हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती.