
अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल
हुंडा आणि पैश्यासाठी सतत वैष्णवीचा छळ, चारित्र्यावरही संशय?, पुण्यातील घटनेने मोठी खळबळ
पुणे – अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र गव्हाणे यांची सुन वैष्णवी शशांक गव्हाणे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बावधन पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पती शशांक राजेंद्र हगवणे, सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०२३ मध्ये वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. ५१ तोळे सोने, आलिशान चारचाकी, चांदीची भांडी तसेच सुसगाव येथील महागड्या मंगलकार्यालयात लग्न लावून देण्याच्या बोलीवर दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सासरच्या मंडळींनी वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नात चांदीची भांडी दिली नाही याचा राग धरून सासरची मंडळी तिच्याशी घालून पाडून बोलत असे. तसेच तिच्या सासरच्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कारण ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गरोदर राहिली. त्यानंतर शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे बाळ माझे नाही असे म्हणत त्याने तिला मारहाण केली. तसेच तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर सासरच्या छळाला कंटाळून आणि सतत होणारी हुंड्याची मागणी यामुळे तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही तिला त्रास देण्याचे चालूच होते. त्यामुळे शुक्रवारी पाचच्या सुमारास वैष्णवी शशांक हगवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून आत्महत्या केली. काही वेळानंतर पती शशांक हगवणे यांनी दरवाजा ठोठावला. पत्नीने दरवाजा न उघडल्याने शशांक यांनी दरवाजा तोडला. त्यानंतर ही गंभीर घटना समोर आली. शशांक यांनी कस्पटे यांच्याकडे जमीन घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केली होती. पण त्याला नकार देताच ‘आम्ही भुकूम मधील प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आहोत. आमच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही दोन कोटी देवू शकत नाही. तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही’, असे म्हणत मारहाण केली. तसेच तिला माहेरी आणून सोडले, असे फिर्यादीत नोंदविण्यात आले आहे.
शुक्रवारी शशांकने फिर्यादीच्या नातेवाईकाला वैष्णवीसोबत भांडण झाले असल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता त्याने वैष्णवीने गळफास घेतला असून तिला खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी आपल्या नातेवाईकासह रुग्णालयात गेले असता डॉक्टरांनी वैष्णवीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.