दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दापोलीहून चिपळूण येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दापोलीतील दाभोळ खाडी परिसरात या तरुणीचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिचा मृत्यू नेमका कसा झाला? हा घातपात आहे कि आत्महत्या आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मृत तरुणी ही दापोली येथे स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होती.
काय घडले नेमके?
मृत तरुणी ही मूळची चिपळूण तालुक्यातील ओमळी गावची रहिवासी होती. मात्र नोकरीनिमित्त ती दापोलीत राहत होती. शनिवारी-रविवारी बँकेला सुट्टी असायची. त्यामुळे ती दोन दिवस गावी आपल्या घरी जायची. नेहमीप्रमाणे या शुक्रवारी रात्री तिने भावाला फोन करुन उद्या सकाळी गावी येत असल्याचे सांगितले. मात्र ती घरी पोहोचलीच नाही. यानंतर तिच्या घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर तिच्या फोनचे लास्ट लोकेशन तपासले असता ते खेडमध्ये असल्याचे आढळून आले. यादरम्यान दाभोळ खाडी परिसरात एका तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळला.
या घटनेची माहिती मिळताच दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पूजा हिरेमठ, सागर कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद दाभोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तरुणीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला?, कोणत्या कारणातून झाला?, तरुणीसोबत नेमकं काय घडलं? याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच या तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हे स्पष्ट होईल.