
पिंपरी – चहाच्या हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेत असल्याने मुलाने लाकडी दांडक्याने मारत वडिलांचा खून केला. थेरगाव येथील वनदेवनगर येथे रविवारी (दि. १) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
काळुराम महादेव भोईर (५२) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी त्यांचा मुलगा प्रथमेश काळुराम भोईर (२४) याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक श्वेता रणजित घोडपडे-शिंदे यांनी सोमवारी (दि. २) याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बीएनएस कायदा कलम १०३ (१) अन्वये पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश याचे वडील काळुराम हे नेहमी चहाच्या हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात असत. याचा राग प्रथमेश याला आला. या रागातूनच त्याने वडील काळुराम यांना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरात लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्यांचा खून केला.