मी या भागाचा भाई आहे, मला फुकट वडापाव द्यायचा असे म्हणत वडापाव विक्रेत्याला दमदाटी करुन काचेच्या बाटलीने डोळ्यावर व गालावर मारहाण करुन जखमी केले.हा प्रकार मंगळवारी (दि.28) रात्री दहाच्या सुमारास विश्रांतवाडी-आळंदी रोडवरील एन.डी.ई. गेट समोरील मोकळ्या पटांगणात घडला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी स्वयंघोषीत भाईच्या मुसक्या आवळल्या आहेत.याबाबत विक्रम एकनाथ पवार (वय-41 रा. शंकर मंदीरा जवळ, कळसगाव, विश्रांतवाडी, पुणे) यांनी बुधवारी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम मधुकर खैरे (वय-25 रा. कळस, विश्रांतवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 387, 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभम खैरे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे . त्याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. एन.डी.ई गेट समोरील मोकळ्या पटांगणाजवळ असलेल्या सार्वजनिक रोडवर वडापावचा गाडा लावून व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी शुभम खैरे वडापाव खाण्यासाठी आला होता. मात्र, फिर्यादी यांनी वडापाव संपल्याचे त्याला सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन आत्ताच वडापाव पाहिजे, नसेल तर गल्ल्यातील पैसे दे असे म्हणत पैशांची मागणी केली.दादा आहे मी या भागाचा, केसेस आहेत माझ्या नावावर, कोण काय वाकड नाही करत आपलं आणि लक्षात ठेव जेव्हा जेव्हा मी तुझ्या गाडीवर येईल तेव्हा मला फुकट वडापाव द्यायचा, गल्ल्यातील पैसे काढून द्यायचे, नाहीतर तुझ्याकडे बघून घेईन, अशी दमदाटी करुन शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता आरोपीने काचेची बाटलीने फिर्यादी यांच्या उजव्या डोळ्यावर आणि गालावर मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस करीत आहेत.