
पुण्यातील नऱ्हे भागात दारुच्या नशेत एका तरुणाने सात दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.4) मध्यरात्री तीनच्या सुमारास नऱ्हे-धायरी रोडवरील अश्विनी अपार्टमेंट समोरील बंद पडलेल्या बांधकामाच्या साईटवर घडली होती.याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.बबलू इस्लाम अन्सारी (वय 19, रा. अश्विनी अपार्टमेंटच्यामागे, चव्हाण चाळ, नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ओंकार महेश धानेपकर (वय 24, रा. अश्विनी अपार्टमेंटजवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर आयपीसी 435 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बबलू कामधंदे करत नाही. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. अश्विनी अपार्टमेंट समोर असलेल्या मोकळ्या जागेत परिसरातील रहिवासी वाहने लावतात. मंगळवारी मध्यरात्री बबलूने अश्विनी अपार्टमेंट समोर लावलेल्या दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेत दोन दुचाकी पूर्णपणे जळाल्या. पाच दुचाकींना झळ पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास करुन बबलू अन्सारी याने दुचाकी पेटवून दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड करीत आहेत.