
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात घडलेल्या थरारक घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी एका सलून मालकाने तीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला, यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीचा एन्काऊंटर केला आहे. त्यामुळे बदायूंतील अनेक भागात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी लोकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक पोलीस ठाण्यांतील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जावेद हा सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा कॉलनीत सलूनचे दुकान चालवत होता. मंगळवारी सायंकाळी त्याने अन्नू (11) आणि आयुष (6) या दोन भावांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली, तर एका मुलाला गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी जावेद फरार झाला. माहिती मिळताच तेथे आलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. मृत मुलांच्या नातेवाइकांनी मंडई समिती चौकात मुलांचे मृतदेह टाकून रास्ता रोको केला.
पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी गोंधळ घालत तोडफोड करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून डीएम-एसपीसह अनेक पोलिस ठाण्याचे फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.