
पाठीचा मणका अजूनही शाबूत आहे, म्हणून सांष्टांग नमन…
अभिनेत्रीचा शिंदे गटाच्या मंत्र्याला सणसणीत टोला, अभिनेत्री का भडकली, नेमकं घडलं काय?, कोण आहेत ते मंत्री?
ठाणे – मुंबई आणि उपनगरात सर्वसामान्यांना अनेकदा वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागतं. अनेक कलाकारही याबद्दल तक्रार करताना दिसतात. पण सहसा समाज माध्यमांवर कोणीही व्यक्त होत नाही. पण एका मराठी अभिनेत्रीने ठाण्यातील घोडबंदर रोडबाबत थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे विचारणा केली आहे.
ऋतुलाजाही घोडबंदर रोडवरुन जाताना इतर कलाकारांसारखाच अनुभव आला आहे. ऋतुजाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने प्रताप सरनाईकांना टोलाही लगावला आहे. “अत्यंत सुंदर रस्ता, घोडबंदर रोड…पाठीचा मणका अजून शाबुत आहे, म्हणून साष्टांग नमन”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ऋतुजाने प्रताप सरनाईक यांनाही टॅग केलं आहे. विशेष म्हणजे अनेक मराठी कलाकारांनी या रस्त्याबाबत तक्रारी व्यक्त केल्या आहेत. अभिनेता आस्ताद काळे, मिलिंद फाटक, अभिनेत्री सुरभी भावे यांसह अनेक कलाकारांनी वेळोवेळी आपल्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत. संताप व्यक्त करण्याबरोबरच रस्त्यांच्या या दुरवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंतीसुद्धा अनेकदा केली आहे. ऋतुजा बागवे हिच्या या व्हिडिओमुळं पुन्हा एकदा ठाणे घोडबंदर रस्त्याचा प्रश्न चर्चेत आलाय. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याची दखल घेणार का? यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. ठाणे शहरातील घोडबंदर रोडची समस्या काही नवीन नाही. देशभरातून मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना आणि मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळं निर्माण होणारी वाहतूककोंडी, रस्त्यांवरचे खड्डे ही अनेक वर्षांची समस्या आहे. पण अजूनही ती सुटलेली नाही.
ऋतुजा मराठीसह हिंदी टीव्ही क्षेत्रातली लोकप्रिय अभिनेत्री आहे. ऋतुजाने ‘स्वामिनी’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘तू माझा सांगाती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती हिंदी टेलिव्हिजनद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘माटी से बंधी डोर’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. यासह तिने काही सिनेमांतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.