विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडांना बांधून केली धुलाई
विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर आरोप, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
झारखंड दि १ (प्रतिनिधी)- शिक्षक आपले गुरु असतात. आई वडिलानंतर शिक्षकांनाच जास्त मान असतो पण त्याला तडा जाणारी घटना समोर आली आहे. झारखंडच्या डुमका जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारहाण केली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.विशेष म्हणजे शाळेकडून यावर कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
डुमका जिल्ह्याच्या गोपीकंदर भागात असलेल्या एका निवासी शाळेतील नववीतील मुलांनी आक्रमक होत शिक्षकांनाच शिक्षा केली आहे. परीक्षेचा निकाल लागला त्यात आम्हाला कमी मार्क देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शाळेतील नववीच्या वर्गातल्या एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी जवळपास ११ विद्यार्थ्यांना ड श्रेणी देण्यात आली होती. ही श्रेणी म्हणजे नापासच असते. या शिक्षकांनी प्रात्याक्षिकांचे गुण कमी दिल्याने आम्ही नापास झालो, अस म्हणत या विद्यार्थ्यांनी रागाच्या भरात त्यांचे शिक्षक कुमार सुमन आणि इतर दोघांना झाडाला बांधून मारहाण केली आहे. विशेष म्हणजे याचे फेसबुक लाइव्ह करण्यात आले होते. पण शिक्षकांनी मात्र गुण समाविष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते त्यांनी काय केले हे माहित नाही असे उत्तर दिले आहे.
मारहाण करण्यात आलेले कुमार सुमन हे पूर्वी त्या शाळेचे मुख्याध्यापक होते, मात्र त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते. त्यामुळे शाळेतील अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होऊ नये, म्हणून कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.