(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) – फिरणार्यासाठी दुचाकी गाड्या चोरुन त्या विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
श्रावण माधव शिंदे असे या चोरट्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ परिसरात चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्यामुळे वरिष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चोरीस गेलेल्या दुचाकीसह एक जण फिरत आहे. आरोपीचा शोध घेत असताना सातारा रोडवरील भुयारी मार्गालगतचे लोखंडी पुलाजवळ संशयित श्रावण शिंदे मिळाला. त्याच्याकडील दुचाकी चोरीची होती. अधिक तपासात त्याने चोरलेल्या ६ लाख रुपयांच्या ११ दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
श्रावण शिंदे हा फिरण्यासाठी गाड्या चोरायचा. त्यानंतर गाड्यांसाठी ग्राहक शोधत फिरायचा. कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून त्याने एकाकडून ५ हजार रुपये घेऊन दुचाकी दिली होती. नंतर त्याने कागदपत्रे दिली नाही आणि बाकीचे पैसे घेण्यासाठी आला नाही. पोलीस जेव्हा शिंदे याला घेऊन त्याचा दारात गेले, तेव्हा त्याला ही गाडी चोरीची असल्याचे समजले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने,सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, हनुमंत मासोळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, सतिश मोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश खेरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, अभिनय चौधरी मितेश चोरमोले, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.