अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा
पोलीसांच्या तपासात पत्नीचा धक्कादायक खुलासा, साथ देणाऱ्यालाही अटक
लातूर दि १४(प्रतिनिधी)- दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला होता. तपासात मृत व्यक्ती अरविंद पिटले असल्याचे सिद्ध झाले. तो देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर आले. त्या गुन्हाचा तपास करताना पोलीसांनी त्यांच्या पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या तपासात पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे.
देवणी तालुक्याचा रहिवासी असलेला अरविंदची आणि त्याच्या पत्नीची एका कामानिमित्त सुभाष शिंदे याच्याशी ओळख झाली. या परिचयातून सुभाष शिंदे अरविंदच्या घरी ये-जा करू लागला. त्यामुळे सुभाष आणि अरविंदच्या पत्नीत प्रेमसंबंध स्थापित झाले. त्यामुळे गावात याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे अरविंद पत्नीला घेऊन लातूरला आला.पण लातूरला आल्यानंतर सुभाष शिंदे आणि अरविंदच्या पत्नीला अधिकच मोकळेपणा मिळाला. पण दोघांनाही आता अरविंदचा अडथळा होऊ लागल्याने त्यांनी अरविंदचा काटा काढायचे ठरवले. त्यासाठी नियोजन करुन जेवायच्या निमित्ताने तिघेही औसा येथील एका धाब्यावर गेले. त्यानंतर बाभळगाव परिसरातील कॅनॉलजवळ दोघांनी अरविंदचे हातपाय बांधून गळ्यातील गमज्याने गळा आवळत खून केला. आणि मृतदेह कॅनॉलच्या पाण्यात टाकला.
पोलिसांना मृतदेहाची तपासणी करताना मोबाईल आढळून आला. शिवाय पती बेपत्ता असूनही त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार न दिल्यामुळे पोलीसांनी पत्नीवर संशय व्यक्त करत तिची चाैकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिचा प्रियकर सुभाष शिंदेला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.