
भररस्त्यात सोन्याच्या व्यवहारातून अपहरणाचा थरार
अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद, आले आणि कारमध्ये कोंबून घेऊन गेले, नेमके काय घडले?
मंगळूरु – देशात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगोदर निर्जंस्थळी होणाऱ्या गोष्टी आता भर रस्त्यात आणि वर्दळीच्या ठिकाणी होत आहेत. असाच एक चित्रपटाच्या कथानकाला लाजवणार अपहरणाचा थरार मंगळूरु मध्ये घडला आहे.
कर्नाटकमधील मंगळूरु येथील कार स्ट्रीट परिसरात नुकतीच एक अपहरणाची धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोन्याच्या व्यवहारातून एका व्यक्तीला भरदिवसा आणि भर रस्त्यातून गुंडांनी पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण दुचाकीवर जात असताना, गुंडांच्या टोळीने प्रथम त्याचा रस्ता अडवला. काही क्षणातच, त्यांच्याजवळ एक कार येऊन थांबली. कोणताही विचार न करता हल्लेखोरांनी त्या व्यक्तीला कारमध्ये कोंबत तेथून पळ काढला. तर दुसऱ्या एका व्यक्तीने अपहरण झालेल्या व्यक्तीची दुचाकी घेत तेथून पोबारा केला. हा सगळा थरार इतक्या वेगात घडला की अपहरण झालेल्या व्यक्तीला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. सोन्याच्या व्यवहारातून किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हे अपहरण झाले, याचा तपास पोलीस करत आहेत.
खुलेआम गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तरी पोलिसांनी अद्याप याबाबत भाष्य केलेले नाही.