Latest Marathi News
Ganesh J GIF

जाच संपेना! आधी वैष्णवी नंतर भक्ती तर आता साक्षी

पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली, पुरोगामीचा बुरखा फाटला, महाराष्ट्रात घडतय काय?

परभणी – राज्यात वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येची चर्चा रंगली आहे. सासरच्यांच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली असून, तिच्यावर करण्यात आलेला छळ पाहून संतापाची लाट पसरली आहे. त्यातच आता आणखी एका तरूणीने त्रासाला कंटाळून आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

साक्षी चंद्रप्रकाश लाटे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. परभणीच्या झरी गावात ही घटना घडली आहे. साक्षीचा विवाह १२ डिसेंबर २०२२ रोजी गावातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या चंद्रप्रकाश लाटे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच साक्षीला तिच्या सासू प्रमिला लाटे आणि सासऱ्या भिकुदास लाटे यांनी मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिला स्वयंपाक नीट न येणे, कोणतेही काम व्यवस्थित न करणे अशा कारणांनी सतत त्रास दिला जात होता. याशिवाय नवरा चंद्रप्रकाशही दारू पिऊन तिला मारहाण करत असे. शिवाय तो तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. तसेच तो तिला आई वडिलांशी देखील बोलू देत नव्हता. या त्रासाला कंटाळून साक्षी माहेरला निघून आली. साक्षीने पती-पत्नीत समेट करण्यासाठी भरोसा सेलकडे अर्ज दिला होता, मात्र यामुळे उलट तिला अधिक त्रास सहन करावा लागला. नवऱ्याने तिला ‘तू पोलिसांकडे का गेलीस?’ असा प्रश्न विचारत अधिक त्रास दिला. तो सतत म्हणत असे की, “मी एमपीएससी करतो, मला नोकरी लागणार आहे, मी तुला घेऊन जाणार आहे,” अशी धमकी देत तिचा मानसिक छळ करत होता.साक्षीच्या वडिलांनी तिला नांदायला घेऊन जाण्यासाठी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कुटुंबियांची समेट घडवण्यासाठी भेट घेतली होती, पण त्याचा काही फायदा झाला नाही. पण नंतर सासरच्या लोकांनी साक्षीला फोनवर त्रास देण्यास सुरुवात केली. २१ मे सायंकाळी साक्षीने पतीसोबत फोनवर संवाद साधला. त्यानंतर तिने रुममध्ये जाऊन ओढणी फॅनला बांधून गळफास घेतला. तिला तात्काळ झरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले, पण उपचारादरम्यान ती मरण पावली. महाराष्ट्रातील विवाहितेंच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्याची मान शरमेने खाली गेली आहे.

साक्षीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती चंद्रप्रकाश लाटे, सासरे भिकुदास लाटे, सासू प्रमिला लाटे, भाया दैवत लाटे, जाऊ सुजाता लाटे व ननंद दयावंती यांच्यावर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप आहे. परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!