
‘संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा’
अजितदादाच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी, मेसेजद्वारे दिली धमकी, या कारणामुळे आमदाराला धमकी
अहिल्यानगर – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवरून टेक्स्ट मेसेजद्वारे ही धमकी आली आहे.
हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि केलेल्या ठाम वक्तव्यांमुळे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यामुळे जगताप यांना धमकी देण्यात आली आहे. सदर मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट इशारा देण्यात आला असून, या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम जगताप गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत आहेत. नुकत्याच त्यांच्या काही विधानांमुळे ते वादग्रस्त ठरले होते. जगताप यांनी एका सभेत म्हटले होते की, “औरंगजेब भारतातला नव्हता, त्याची वंशावळ परकीय होती. जो मुस्लिम भारतात आणि महाराष्ट्रात राहतो, त्याने औरंगजेबाच्या विचारसरणीशी सहमत असू नये. जे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात, ते भारतीय मुस्लिम असू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या डीएनए टेस्टची गरज आहे. या विधानावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचे समर्थनही केले होते. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाकडून आमदार जगताप यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. हिंदू समाजाची बाजू आमदार जगताप अतिशय हिरीरीने मांडत आहेत. अशातच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार अमिना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मेसेजचा स्त्रोत, फोन नंबर आणि इतर तांत्रिक पुरावे मिळवण्यासाठी पोलीसांकडून सायबर विभागाची मदत घेतली जात आहे.