
पत्नीने प्रियकराच्या मदतीने दारु पाजून केली पतीची हत्या
मुलांसमोरच केली पतीची हत्या, हत्या करुन रचला वेगळाच बनाव, एका चुकीमुळे अडकली
मुंबई – मुंबईतील मालाड परिसरातून भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राजेश चौहान असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश चौहान हा पत्नी पुजा आणि दोन मुलांसोबत मालाड परिसरात राहत होता. राजेशला दारूचे व्यसन होते. त्याचा मित्र इम्रान हा नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता पण त्याची कोठेही सोय न झाल्यामुळे तो राजेशच्या घरी राहत होता. राजेशच्या घरी राहत असल्यामुळे इम्रान आणि राजेशच्या पत्नीत जवळीक निर्माण झाली. त्यातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला बाजूला करण्यासाठी पूजाने प्रियकरासोबत मिळून राजेश चौहान यांच्या हत्येचा कट रचला. राजेश चौहान यांना दारू पाजून चाकूने त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी राजेश चौहान यांचा मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांना या घटनेचा संशय येऊ नये म्हणून दोघांनी मालवणी पोलिस ठाण्यात जाऊन राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पण तपासाअंती सत्य अखेर समोर आले. दरम्यान मृत राजेश आणि आरोपी उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
राजेशचा शोध सुरू असताना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये इम्रान दुचाकीवरून राठोडी गावाच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसला. यामध्ये दुचाकीवर ते तिघे दिसत होते. संशयावरून पोलिसांनी इम्रान याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने महिलेच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे कबूल केले. पोलीस पुढील तपास करत आहेत.