मालकाने छत्रपती संभाजीनगर येथे कुरियरची डिलिव्हरी घेऊन जाण्यास सांगितले. सोबत दुसरा चालकही देत नसल्याने कामगाराने औरंगाबादला जाण्यास नकार दिला. त्यामुळे मालकाने चिडून हाताने मारहाण करुन कामगाराला जखमी केले.याबाबत दीपक शिवाजी कुचेकर (वय ३२, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धनाजी पांडुरंग शिंदे (वय ५०, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील फ्रंटलाईन कुरियर येथे गुरुवारी पहाटे दीड वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फ्रंटलाईन कुरिअर येथे छोटा हत्ती टेम्पोवर चालक म्हणून काम करतात. २४ जुलै त्त्यांनी दिवसपाळीमध्ये कुरिअरची डिलिव्हरी पोचवली. रात्री ११ वाजेपर्यंत त्यांची ड्युटी असल्याने ते कार्यालयात थांबले होते. कुरिअरचे मालक शिंदे यांनी रात्री अकरा वाजता तुला आता छत्रपती संभाजीनगर येथे कुरिअर डिलिव्हरी पोहचवायची आहे, असे सांगितले. त्यावर त्यांनी दिवसपाळी केली असल्याने आता रात्रपाळी कशी काय करणार अशी त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा शिंदे यांनी तुला जावेच लागेल, नाही तर काम सोडून निघून जा, असे सांगितले. त्यावर त्यांनी दुसरा चालक तरी बरोबर द्या असे सांगितले. त्यांना थांबून ठेवले.
पहाटे दीड वाजता दुसरा चालक मिळणार नाही, तुला एकट्याच जावयाचे असे सांगितले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिल्यावर शिंदे यांनी चिडून आताचे आता काम सोडून निघून जा, असे म्हणून त्यांना धक्का बुक्की केली. तेव्हा फिर्यादी यांनी माझ्या कामाचा पगार द्या मी जातो काम सोडून, असे म्हणाले. त्यावर आता काही पगार मिळणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी तेथील कुरियरची एक बॅग उचलून जोपर्यंत माझा पगार देणार नाही, तो परत ही बॅग माझ्याकडे राहिल, असे म्हणून ते बॅग घेऊन फुटपाथवर आले. तेव्हा शिंदे यांनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर कमरेला लावलेला कोयता काढून त्यांच्या हातावर, बोटांवर मारुन त्यांना जखमी केले. पोलीस हवालदार दगडे अधिक तपास करीत आहेत.