
थार गाडीतून आले आणि ५० लाख चोरी करुन गेले
पुण्यात भरदिवसा जबरी चोरी, चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद, चोरीसाठी थारचा वापर
पुणे – पुण्यात एक धाडसी चोरी करण्यात आली आहे. यावेळी चोरट्यांनी चक्क चोरीसाठी थार गाडीचा वापर केला आहे. पुण्यात आंबेगाव परिसरात चोरट्यांनी एका व्यावसायिकाची ५० लाखाची रोकड घेत पोबारा केला आहे.
चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील अभिजीत पवार हे त्यांचा मित्र मंगेश ढोणे याच्यासोबत पुण्यात आले होते. त्यांच्याकडे ५० लाखांची रोकड होती जी पुण्यातील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी आणली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बाबाजी पेट्रोल पंप परिसरात दोघे चालत असताना काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या दोघांनी मंगेश ढोणे यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत पवार हे व्यावसायिक आहेत. त्यांचा स्टील, पत्र्यांचा व्यवसाय आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले.
मागील काही दिवसापूर्वी पुणे शहरात घरफोडीचे आणि जबरी चोरीचे प्रकार चांगलेच वाढीस लागले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.