लाखो रुपयांच्या मोबाईल चोरीसाठी चोरटयांनी चक्क वापरली गोणी ; अवघ्या ४ मिनिटांत केली चोरी, व्हिडिओ व्हायरलं
दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या वसंत कुंज येथील मोबाईल शोरूममध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखो रुपयांचे मोबाईल गोणीमध्ये भरून चोरटे पळून गेले. मोबाईल शोरूममधील चोरीची ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एका पॉश परिसरात चोरीची ही घटना घडली. येथे तीन चोरट्यांनी मिळून मोबाईल शोरुममध्ये प्रवेश केला. त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यांचं ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्यामध्ये मास्क घातलेले तीन चोर मोबाईल शोरूममध्ये घुसल्याचे दिसत आहे. शोरुममध्ये शिरल्यानंतर सर्वजण गोणीमध्ये सर्व मोबाईल भरू लागतात. तीन चोरट्यांनी अवघ्या चार मिनिटांत संपूर्ण दुकान रिकामं केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसत आहे की, दोन चोरटे तोंडावर मास्क लावून दुकानाचे शटर उघडून प्रथम प्रवेश करतात आणि त्यानंतर एक चोरटा गोणी पकडून उभा राहतो तर दुसरा त्यात मोबाईल भरत राहतो.
इतक्यात तिसरा चोर आत शिरला. एक जण आतून सामान बाहेर काढतोय, दुसरा उचलून गोणीत ठेवतोय आणि तिसरा गोणी धरून उभा आहे. पहिली गोणी भरल्यावर तिसरा चोर दुसरी गोणी घेऊन येतो आणि नंतर दुसऱ्या गोणीमध्ये मोबाईल आणि त्याच्याशी संबंधित वस्तू भरू लागतो. तीन चोरट्यांनी ही संपूर्ण चोरी ४-५ मिनिटांत केली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.