
या अभिनेत्रीने बंदुकीचा धाक दाखवून १० लाख रूपये उकळले
प्रसिद्ध अभिनेत्रीसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन तास डांबून ठेवले आणि तो मेलही करायला लावला, नेमके काय घडले?
मुंबई – अंधेरीतील एका दिग्दर्शकाला बंदुकीच्या धाकावर तीन तास ओलीस ठेवत दहा लाख रुपये उकळल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी अभिनेत्री निकिता घाग, अभिनेता विवेक जगताप यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकारामुळे सिने जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
हा प्रकार १४ ऑगस्ट २०२५ रोजी घडला असून, ५ सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक कृष्णकुमार मीणा यांनी या अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले आहेत. मीणा म्हणाले की, ते पंजाबी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपट बनवतात. काही महिन्यांपूर्वी ते निकिता घागच्या संपर्कात आले. ती काही प्रोजेक्टमध्ये काम मिळवण्यासाठी मुंबईतील दिग्दर्शकाच्या अंधेरी कार्यालयात आली होती. यादरम्यान निकिताने सांगितले की ती एका गुंतवणूकदाराला ओळखते, ज्याला दिग्दर्शक कृष्णकुमार मीणा यांनी भेटावे. पण नंतर दिग्दर्शकाने तिला गुंतवणूकदाराला भेटू देण्यास नकार दिला. नंतर, एका व्यक्तीने स्वतःला जगताप म्हणून ओळख करून देऊन आणि स्वतःला गुंड असल्याचे सांगून, त्याला शिवीगाळ केली आणि मारहाण करत २५ लाख रुपयांची मागणी केली. या कामात इतर काही लोकही सहभागी होते. २५ लाख रुपयांसाठी जवळजवळ तीन तास चाकू आणि पिस्तूलच्या धाकावर ओलीस ठेवण्यात आले होते. त्याच्या सुरक्षेसाठी त्याने निकिता घाग आणि तिच्या सहकाऱ्यांना सुमारे १० लाख रुपये हस्तांतरित केले. एवढंच नाही तर, आरोपीने निर्मात्याच्या कर्मचाऱ्याला निकितासाठी अॅडव्हान्स अॅक्टिंग फी म्हणून रक्कम नमूद करणारा ईमेल लिहिण्यास भाग पाडलं. निर्मात्याने सांगितलं की, त्याला तब्बल तीन तास ऑफिसमध्ये बंद ठेवण्यात आलं होतं. शिवाय याबद्दल कोणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील… असं देखील निर्मात्याला धमकावण्यात आले. दरम्यान, घाग यांनी मीना यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप करून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप मीना यांनी केला आहे.
आंबोली पोलिसांनी अभिनेत्री निकिता घाग, विवेक जगताप सह १२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), १८९(२) (बेकायदेशीरपणे पैसे ट्रान्सफर करून घेणे) आणि भारतीय न्याय संहिताच्या इतर संबंधित तरतुदींसह शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.