
पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील तीन तरुणांसह एका महिलेला अज्ञात आरोपींनी अपहरण करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कारच्या डिग्गीत घालून अज्ञातस्थळी नेत त्यांना काठी, कोयता आणि तलवारीने मारहाण केली गेली.तसंच पाय बांधून खिडकीला उलटं लटकवण्यात आलं. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँग, हिट अँड रन प्रकरण, ड्रग्ज प्रकरणाची चर्चा असतानाच आता या घटनेने पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शिक्रापूर येथील तीन तरुण आणि एका महिलेचे दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने अपहरण केले. तीन जणांना अमानुष मारहाण केलीय. कोयता लाठ्या काठ्यांनी मारहाण करत हात पाय बांधून उलटे लटकवल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. आरोपींचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत.मारहाणीचे झाल्यानंतर पुणे ग्रामीण एसपी पंकज देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी 2 पोलीस पथकं रवाना देखील झालीत. पैशाच्या देवाणघेवाणीतून हा मारहाणीचा प्रकार घडल्याची माहिती मिळते. आरोपी आणि पीडित हे दोन्ही कुटुंबं शिक्रापर परिसरातच राहतात.

पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तीन गाड्यांमधून आलेल्या काही जणांनी तिघांना उचलून नेलं. मारहाण करण्यात आली. तिघांना वेगवेगळ्या खोल्यात ठेवलं. त्यांनी कोयते आणि तलवारीने मारलं. त्यांच्याकडे बंदुकाही होत्या असी माहिती पीडितांनी दिलीय.एका पीडित पुरुषाने सांगितलं की, दोघांना उचलून हातपाय बांधून डिगीत ठेवलं. माझ्याकडे आले. त्यांनी दारुला पैसे मागितले आणि मलाही उचलला. आमचे फोन लपवून ठेवले. खूप मारहाण केले. हातपाय बांधून लाकडाने, कोयत्याने मारहाण केली. तुम्ही चोरी केली म्हणत मारलं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मारहाण करणारे पीडितांना कोणत्या जातीचा आहेस असं विचारत असल्याचंही ऐकू येतं. इतरांची नावे काय आहेत? तुझी जात काय? अशी विचारणा केली जात आहे. पीडिताचे पाय बांधून त्याला खिडकीला लटकवण्यात आलं होतं.



 
						 
			