
माझा आज वाढदिवस, तुझा एका झटक्यात मुळशी पॅटर्नच करणार….
तरुण व्यवसायिकावर जीवघेणा हल्ला, या कारणामुळे केला पाठलाग, तरुण गंभीर जखमी, हात अडवला नाहीतर....
बीड – बीड जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारीमुळे बीड सतत चर्चेत राहिलेले आहे. आता बीड मधील एका तरुण व्यवसायिकाला जुन्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड चर्चेत आले आहे.
व्यवसायिक गोपाल भागवत जाधव यांना जयपाल आशोक माने आणि निशांत विष्णु जाविर यांनी मारहाण केली आहे. याबाबत जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, गोपाल भागवत जाधव हे १९ सप्टेंबर रोजी माझ्या मालकीचे अंबाजोगाई परळी रोड मगरवाडी फाटा येथे असलेल्या माऊली अॅग्रो एजन्सी कृषी केंद्र दुकानात बसले होते. त्या दरम्यान संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांचे मित्र जयपाल आशोक माने आणि निशांत विष्णु जाविर हे दोघे जण जाधव यांच्या दुकानात आले. या दोघांनी जाधव यांना बाहेर ये सांगितल्यावरसुद्धा जाधव बाहेर गेले नाही. त्यानंतर आरोपी जयपालने हातात लोखंडी कत्ती कपडयात लपवून जाधव यांच्या जवळ गेला आणि कपडा बाजुला फेकुन देवुन दोन्ही हातानी लोखंडी कत्तीने त्यांच्या मानेवर धरत हल्ला केला. त्यावेळी गोपाळ यांनी हल्लेखोरांना एका हाताने अडवल्यामुळे डाव्या हाताच्या करंगळीवर वार केला. या हल्ल्यानंतर जाधवांनी हल्लेखोरांना ढकलून पळ काढला. मात्र हल्लेखोर जयपाल आणि विष्णु जाबिर हा मोटार सायकलवर बसून कत्ती हातात घेवुन “आज माझा वाढदिवस आहे, तुझा मुळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत मोटारसायकलने जाधव यांचा पाठलाग केला. पण जाधव त्यांच्या एका मित्राच्या घरात घुसले आणि दाराला कडी लावली, त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोनकरून घडलेली आपबिती सांगितली.
या घटनेने बीडमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. पण बीड सतत का धुमसत आहेत, हा चर्चेचा विषय आहे.