हडपसरमध्ये टोईंग कर्मचाऱ्यांनी दुकानदाराला बेदम मारहाण
मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद, महिला पोलिसाची बघ्याची भूमिका, वाचा काय घडले
पुणे दि २(प्रतिनिधी)- बेशिस्त वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईसाठी वाहतूक शाखेने नेमलेल्या टोईंग व्हॅनवरील कामगार आणि एका दुकानदाराची हाणामारी झाल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.विशेष म्हणजे पोलीसासमोरच ही हाणामारी झाली होती. त्यामुळे टोइंग कामगाराच्या अरेरावी विरूद्ध संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बराई यांचं सोलापूर महामार्गावर मंडईत फुटवेअरचे दुकान आहे. बराई यांच्या दुचाकीतून पेट्रोल गळती होत होती. बराई यांनी दुकानासमोर दुचाकी लावून पाहणी करत होते. ते आपल्या दुकानात असताना टोईंग कर्मचारी रस्त्यावर असलेल्या वाहनांवर कारवाई करत होते. कारवाई दरम्यान टोईंग कर्मचारी बराई यांच्या दुकानासमोर उभी असलेली त्यांची दुचाकी उचलायला गेले. यावेळी बराई यांनी कर्मचाऱ्यांना अडवले. त्यामुळे बराई चिडले. बराई आणि कामगारात यावेळी बाचाबाची झाली. चिडलेल्या बराई यांनी धक्का देत कर्मचाऱ्यांवर विट उगारली. याच रागातून कर्मचाऱ्यांनी दुकानदाराला बेदम मारहाण केली. त्या वेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याने बघ्याची भूमिका घेतली. हा सगळा प्रकार दुकानासमोरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. त्याबाबत या व्यापार्याने तक्रार केली असून या कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. नो पार्कींगमध्ये उभी असलेले वाहन टोइंग करताना अनेकदा वाद होतात. एकदा तर दगडूशेठ गणपती मंदिरासमोर कारवाई करताना पोलीसांनी थेट दुचाकी चालकासह दुचाकी जप्तीची कारवाई केली होती. या प्रकाराबद्दल वाहतूक पोलीसांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
याबाबत वाहतूक पोलिस विभागचे उपायुक्त विजय मगर यांनी दुकानदारावर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर संबंधित टोइंग व्हॅनवरील कर्मचार्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती दिली आहे. मात्र यानिमित्ताने टोईंग कर्मचार्यांची दादागिरी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.