
ठाणे : कार, बाईक, टॅम्पो किंवा ट्रकचं चलान कापल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण कधी एखाद्या सायकल चालकाचं चलान कापल्याचं तुम्ही ऐकलंय ? हे ऐकून तुम्ही म्हणाल की, हा काय विषय आहे. सायकला नंबर नसतो, मग कसं काय त्याचा चलान कापला जाणार ? हा नियम भारतात कधीपासून लागू झाला ? पण असं काही नाही.
खरंतर एक ट्राफिक पोलिस सायकल चालकासह भांडत करत होता आणि त्याचं चलान कापण्याच्या प्रयत्नात होता. असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ ठाण्यामधील आहे. विरुद्ध दिशेने सायकल घेवून येणाऱ्या सायकल चालकाचे चलन फाडण्याचा प्रयत्नात एक ट्राफिक पोलिस आहे, असं यामध्ये दिसत आहे.
कापूरबावडी येथील हा प्रकार असून वाहतूक कोंडी होत असल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई करत होते, तेवढ्यात एक सायकल स्वार विरुद्ध दिशेने येताना पोलिसांनी पाहिले आणि त्याला थांबवून त्याचे चलन फाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सायकलला नंबर प्लेट नसल्याने पोलिस कर्मचारी काहीच करु शकला नाही.