
चलन केल्याने वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण
मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, आरोपीच्या पत्नीचा वेगळाच दावा?
ठाणे – ठाण्यातील वाघबील ब्रिज चौकात वाहतूक पोलीस आणि दुचाकीस्वारामध्ये जोरदार राडा झाला. एका दुचाकीस्वाराने पोलिसांना मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अनिरुद्ध कुवाडेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अनिरुद्ध कुवाडेकर हा मोटरसायकलवर हेल्मेटशिवाय प्रवास करत होता, त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. पोलिसांनी त्याचा चालान भरायाला सांगितले, त्यामुळे संतापलेल्या अनिरुद्धने पोलीसांबरोबर वाद घालायला सुरुवात केली. पण चलन भरावेच लागेल असे सांगितल्यावर अनिरुद्धने वाहतूक पोलिसालाच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ड्युटीवर असणाऱ्या इतर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्याबरोबर देखील वाद घातला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहतूक नियंत्रण कक्ष ठाणे यांच्या आदेशाने स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आले होते. त्याअंतर्गत पीएसआय यादव व चार पोलीस कर्मचारी वाघबील ब्रिजखाली विशेष कारवाई करीत होते, त्यावेळी ही घटना घडली आहे. अनिरुद्ध कुवाडेकर याला या प्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर ठाणे वाहतूक डीसीपी पंकज शिरसाट म्हणाले की, वाहतूक पोलिसांशी झटापट करणाऱ्या व्यक्तीचा परवाना रद्द करण्यासाठी आम्ही ठाणे आरटीओला पत्र लिहिले आहे. त्या व्यक्तीचे अयोग्य वैद्यकीय प्रमाणपत्र देखील सोबत जोडले आहे, असे ते म्हणाले.
वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने ठाणे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. आरोपीच्या पत्नीने सांगितले की, तिचा पती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही. पत्नीने तिच्या पतीचे वैद्यकीय प्रमाणपत्रही पोलिसांना सादर केले आहे. आता पुढील कारवाईकडे लक्ष असेल.