
पुणे शहरात खुनाच्या दोन घटना, दारुसाठी पैसे न दिल्याने मुलासह नातवाकडून महिलेचा खून ;हडपसर मध्ये तरुणाचा खून
पुणे शहरामध्ये खूनाच्या दोन घटना घडल्या आहेत . हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.दारु पिण्यास पैसे देत नसल्याने मुलाने आणि नातवाने बेदम मारहाण करुन एका 60 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे. तर एका अनोळखी व्यक्तीने तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने मारहाण करुन खून केल्याची घटना हडसपर परिसरात घडली आहे.
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेमध्ये मंगल मोहन नेटके (वय-60 रा. कामराजनगर) या महिलेचा खून झाला आहे याबाबत संध्या अरुण वाघमारे (वय-50 रा. कामराजनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मयत महिलेचा मुलगा मयुर मोहन नेटके (वय-30) आणि 10 वर्षीय नातवावर आयपीसी 302, 324, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर नेटके हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मंगल नेटके या फिर्यादी यांच्या मावशी आहेत. सोमवारी (दि.13) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलगा मयुर आणि नातु यांनी मंगल नेटके यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या मावशीला लाकडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मंगल नेटके यांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी (दि.15) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने एका तरुणाचा अज्ञात कारणावरुन डोक्यात व शरिरावर धारदार हत्याराने वार करुन खून केला . राजेंद्र रामभाऊ शेजुळ (वय-35 रा. कडनगर, चौक, उंड्री) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र यांची पत्नी भाग्यश्री राजेंद्र शेजुळ (वय-29) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे करीत आहेत.