पुण्यात दोन टोळक्यांचा एकमेकांवर हल्ला ! लोखंडी रॉड, चाकू, कोयत्याने केली एकमेकांना मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल
कळस गावठाणातील स्मशानभूमी येथे रात्री साडेअकरा वाजता समोरासमोर आलेल्या दोन टोळक्यांनी एकमेकांवर हल्ला करुन परस्परांना लोखंडी रॉड, चाकू, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. विश्रांतवाडी पोलिसांंनी दोन्ही टोळ्यांमधील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत राहुल भीष्मा चव्हाण (वय २४) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित लोखंडे, गगन लाड आणि स्वप्नील महाजन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कळस गावठाण येथील स्मशानभूमीजवळ सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जेवण झाल्यानंतर त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या स्मशानभूमीच्या जवळील नदी किनारी शौचावरुन परत येत होते. त्यावेळी रोहित लोखंडे व गगन लाड यांनी त्यांच्या कानाखाली मारुन शिवीगाळ, दमदाटीकरुन हाताने मारहाण केली. फिर्यादी यांनी त्यांना का मारताय असे विचारले असता ऐकून न घेता त्यांना मारहाण करत होते. तेव्हा स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांनी रोहित लोखंडे याला ढकलले. तो खाली पडून ओट्याचा कोपरा डोक्याला लागला. त्यानंतर रोहित लोखंडे याने स्वप्नील याला फोन करुन बोलावले. स्वप्नील याने चारचाकीतून लोखंडी रॉड काढून उजव्या हातावर मारले. चाकूने पाठीवर मारले. रोहित फिर्यादीच्या हाताला चावला. तसेच फिर्यादीचे मित्र आकाश पानबोणे, नितेश सदभैया यांनी तेथे येऊन भांडणे सोडवली. तेव्हा आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याविरोधात रोहित उमेश लोखंडे (वय १९) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश परभणे, राहुल चव्हाण, नितेश ऊर्फ रावण (सर्व रा. कळस) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र विशाल नरेंद्र गायकवाड (रा. कळस) याला भेटण्यासाठी स्मशानभूमी येथे त्याची वाट पहात होते. त्यावेळी काही कारण नसताना अचानक आरोपींनी येऊन फिर्यादी यांना मारण्यास सुरुवात केली. कोणते तरी हत्यार काढून डोक्यात मारुन शिवीगाळ करुन हाताने व दगडाने मारहाण करुन जीवे मारण्या प्रयत्न केला. तसेच पोलीस स्टेशनला गेल्यास तुला काय ते दाखवतो, अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्या मित्रास मारहाण करुन दुखापत केली आहे. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.