नाशिक दि १८ (प्रतिनिधी)- नारळाच्या झाडावर दोन बिबट्याची झुंज होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील सांगवी येथील दिलीप घुमरे, सुनील घुमरे यांच्या घराशेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर दोन बिबत्यांची झुंज होत असल्याचा थरार कॅमे-यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील आहे. सांगवी येथील सांगवी धनगरवाडी रोडवर असलेल्या दिलीप घुमरे आणि सुनील घुमरे यांच्या घरा शेजारील आहे घुमरे वस्तीसमोर असलेल्या नारळाच्या झाडावरती या दोन बिबट्याची झुंज पाहायला मिळाली. या दोन बिबट्यांची झुंज होतांना शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र, झाडाचा आडोसा देत शेतकऱ्याने त्याचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले. एक बिबट्या झाडालगच्या मक्याच्या शेतात उतरणार तोच खालून दुसऱ्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बिबटे वा-याच्या वेगाने नारळाच्या झाडाच्या शेंड्यावर चढले हा थरार कॅमे-यात कैद झाला आहे. या ठिकाणी ऊस आणि मक्याचीची शेती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बिबटे मोठ्या प्रमाणात इथे आढळतात. त्यामुळे वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
दोन दिवसांपूर्वी याच भागात बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून याच भागात बिबट्यांचे वास्तव्य आहे. दोन दिवसांपूर्वी वस्तीवरील एका गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला होता.पण सध्या बिबटयाच्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.