
पुणे – कौटुंबिक वादातून दाजीकडून वनराज आंदेकर याचा निर्घुण खून केला जात होता. त्याचवेळी धनकवडीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरुन मामा भाचांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी रात्रीतून ९ जणांना अटक केली आहे.
समीर अनंता खोपटे (वय ३१) आणि समीर कांबळे (वय ३०) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत समीर खापटे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ९ ते १० जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना धनकवडीमधील काळुबाई मंदिराजवळील चायनिज सेंटर व पंचवटी सोसायटीच्या गेटजवळ रविवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. फिर्यादी, समीर कांबळे, महादेव शिवशरणे व इतर मित्र हे धनकवडीत रात्री गप्पा मारत थांबले होते. यावेळी दुचाकीवरुन ९ ते १० जण आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन भाचा व मामा यांनी आज यास जिवंत सोडायचे नाही, असे म्हणून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सहकारनगर पोलिसांनी रात्रीतून ९ जणांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.