दुर्दैवी! पुण्यात नदीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
वाढदिवसाचा आनंद ठरला क्षणभराचा, आईच्या प्रसंगावधानाने वाचले तिसरीचे प्राण, काय घडले?
पुणे दि १(प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यात एकलहरे सुलतानपूर गावालगत असलेल्या नदीवर कपडे धुत असताना दोन सख्ख्या बहिणींचा नदीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिसरी बहीणही आईने थांबवल्यामुळे बचावली आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
आरती खंडागळे, प्रिती खंडागळे असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बहिणींचे नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वाढदिवस असल्याने या बहिणी मुंबई येथून एकलहरे येथे आल्या होत्या. रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सकाळी कपडे धुण्यासाठी घोडनदीवर पाचजणी गेल्या होत्या. घोडनदीवर एकलहरे गावच्या हद्दीतील नवीन पुलाजवळ आरती शाम खंडागळे, प्रीती श्याम खंडागळे, कावेरी बाबासाहेब आरझेंडे, वर्षा नारायण घोरपडे, कुशा नारायण घोरपडे हे सर्वजण कपडे धुत होते. त्यावेळी कावेरी आरझेंडे हिचा पाय सटकून ती घोडनदीच्या पाण्यात पडली व बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी आरती शाम खंडागळे व प्रीती श्याम खंडागळे या पाण्यात उतरल्या. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी तिसरी बहिण देखील घोड नदीत उतरत होती. परंतु, आईने प्रसंगावधान राखल्याने तिला बाहेर आणले. यामुळे सुदैवाने तिचा जीव वाचला. कावेरी बाबासाहेब अलझेंडे आणि वर्षा नारायण घोरपडे या दोन मुली सदर घटनेत बचावल्या आहे. यानंतर दोन्ही मुलींचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष डोके, उपसरपंच दीपक डोके, पोलीस पाटील निखिल गाडे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल डोके, दीपक जाधव, अक्षय धोत्रे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, परंतु घटनेला बराच वेळ झाल्याने आरती आणि प्रीती खंडागळे यांचे मृतदेह हाती लागले.
बुडलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढून मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्या दोघी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुदाम घोडे, ट्राफिक पोलीस कर्मचारी सोमनाथ गवारी, धनेश मांदळे, गणेश येळवंडे, अभिषेक कवडे घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.