
पुणे दि २६(प्रतिनिधी)- मराठीचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. गेल्या १७ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांना मधुमेह आणि जलोदर झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. यामुळे चित्रपट आणि रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे.
अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर काहीच दिवसात त्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली . विक्रम यांनी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमा ही तीनही माध्यमं गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला. ‘बॅरिस्टर’ नाटकाने विक्रम यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. जवळपास ८ वर्ष त्यांनी हे नाटक केलं. परखड व्यक्तिमत्त्वासाठी गोखले विशेष ओळखले जायचे. आपल्या परखड स्वभावामुळे ते अनेकदा वादातही अडकले होते. त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांना अखेरचा सिनेमा ठरला. आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. गोखले यांच्या पश्चात पत्नी वृषाली गोखले आणि त्यांच्या दोन मुली असा परिवार आहे.
विक्रम गोखले यांना २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पण हे अभिनयाचे विद्यापीठ अखेर अनंतात विलीन झाले.