पुणे शहरातील ससून रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलं आहे. ससून ररूग्णालयातील अनेक प्रकरण समोर येत असताना आता पुन्हा एकदा ससून हॉस्पिटल मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ज्या सामाजिक संस्थांकडून बेवारस तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना ससून रुग्णालयात उपचारासाठी सोडतात अशा रुग्णांवर उपचार न करता त्यांना ससूनमधील डॉक्टरांकडून बेवारस ठिकाणी सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ससून रुग्णालयातून बेवारस रूग्णांना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांना रस्त्यावर गुपचूप सोडल जात असल्याच समोर आलंय. डॉक्टरांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबत आत्ता ससून हॉस्पिटल मधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ससून रुग्णालयात निलेश नावाचा मध्यप्रदेश येथील 32 वर्षाचा रुग्ण हा 16 जून रोजी ससून रुग्णालयात ऍडमिट करण्यात आला होता. त्याच्यावर उपचार देखील झाले एवढंच नाही तर त्या रूग्णाच्या पायाची शस्त्रक्रिया देखील झाली आणि कालांतराने तो रुग्ण काही प्रमाणात बरा झाला. पण शस्त्रक्रिया झालेल्या अवघ्या काही दिवसात निवासी डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला चक्क ऑटो रिक्षामध्ये बसत येरवड्याच्या एका निर्जन स्थळी सोडल्याच समोर आलं आहे. आणि जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉ. आदी कुमार या डॉक्टराला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आली. या प्रकरणात काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी ही ससून रूग्णालयात धाव घेत अधिष्ठात्यांना धारेवर धरलं. त्यानंतर संबंधित डॉक्टरला तातडीने निलंबित करणार असल्याचं अधिष्ठात्यांनी स्पष्ट केलंय.गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार वारंवार उघडकीस येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ससून रुग्णालयात उपचार घेणारी रुग्ण कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न निर्माण झालाय.