
शाळेतच महिला मुख्यध्यापिका आणि ग्रंथपाल यांच्यात तुंबळ हाणामारी
मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, मोबाईल फोडला, केस ओढले, शाळेला बनवला आखाडा, चूक कोणाची?
भोपाळ – शाळा हे विद्येचे मंदिर आहे. तिथे मुलांना संस्कार दिले जातात. आणि त्यासाठी शिक्षक महत्वाची भूमिका बजावत असतात. पण सध्या मध्य प्रदेशमधील एका शाळेतील व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, यात महिला मुख्यध्यापिका आणि महिला ग्रंथपाल यांच्यात तुफान हाणामारी झाली आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन येथील एकलव्य आदर्श शाळेत ही मारहाणीची घटना घडली आहे. महिला मुख्याध्यापिका प्रवीण दहिया व शिक्षिका (ग्रंथपाल) मधुराणी यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका शाळेतील दिसत आहे. संपूर्ण व्हिडीओ शाळेत असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केलेला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघी एकमेकांना मारताना, एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत. दोन्ही शिक्षिका एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसत आहेत. त्यापैकी एका महिलेनं दुसरीचा मोबाईल फोन फोडला. हा वाद इतका पेटला होता की, दोघीही एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात करतात. या घटनेच्या वेळी इतर अनेक शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. अखेर एका सफाई कर्मचारी महिलेने जाऊन दोघांना वेगळे केले. महिला ग्रंथपालाने मुख्याध्यापिकेवर विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके वाटल्याचा आरोप केला त्यामुळे संतापलेल्या महिला मुख्यध्यापिकेने महिला ग्रंथपालाला थप्पड मारत तिचा मोबाईल फोडला, त्यामुळेच दोघांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका व महिला ग्रंथपाल यांनी वेगवेगळ्या वेळी मैनगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, जिल्हाधिकारी भव्य मित्तल यांनी दोघांनाही तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चाैकशी करण्यात येणार आहे.
या व्हायरल व्हिडिओवर इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युझरने याला “मांजरींची लढाई” असे वर्णन केले. आहे तर एकाने भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या महिलेचे काैतुक केले आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकजण याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.