रिअल इस्टेट एजंटला जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा घातल्या प्रकरणात विशाल अग्रवाल याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याबाबत लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर. नरावडे यांनी रद्द केला.या गुन्ह्यात न्यायालयाने विशाल अग्रवालची रवानगी पोलिस कोठडीत केली.
बांधकाम व्यावसायिक सुरेंद्रकुमार ब्रह्मादत्त अग्रवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०) या बापलेकासह त्यांचा साथीदार जसप्रीतसिंग राजपाल यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात मुश्ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात सुरेंद्रकुमार अग्रवाल यास नुकताच जामीन झाला आहे. मात्र, विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याविरोधात तपास अधिकाऱ्यांच्या वतीने सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी सत्र न्यायालयात फौजदारी ‘रिव्हिजन’ अर्ज केला.
विशाल अग्रवाल याच्याकडे गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि फोनवरील संभाषण व व्हॉट्सॲपवरील मेसेजबाबत तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी विशाल अग्रवालला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तो युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत केली.