(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – विश्रांतवाडी परिसरात पोलीसांनी एक कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त केले होते. याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत नंतर ड्रग विक्री करणार्या एकाला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद अस्लम मोहम्मद इस्माईल मर्चंट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने त्याला गुजरात येथून बेड्या ठोकल्या आहेत. विश्रांतवाडी भागात लोहगाव याठिकाणी विघ्नहर्ता अर्पाटमेंट येथे एका फ्लॅट मधून ड्रग विक्री सुरु अ्सल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी छापा टाकून एक कोटी रुपये किंमतीचे ४७१ ग्रॅम एमडी ड्रग जप्त केले होते. याप्रकरणी या आधी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित बेंडे व निमेश आबनावे, कुरियर बॉय विश्वानाथ कोनापुरे यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या निमिष आबनावे यांच्याकडे गुन्ह्यातील इतर सहभागी आरोपींची चौकशी केली असता मोहम्मद मर्चंटचे नाव समोर आले होते. अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरात येथील जंबुसर येथे सापळा रचून मोहम्मद मर्चंडला ताब्यात घेतले. अटक आरोपीकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अविनाश लाहोटे, निलेश जाधव, दया तेलंगे पाटील, अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली.