
हनिमूनसाठी गेले आणि गायब झाले आता पतीचा मृतदेह सापडला
काॅफीचा वाद जीवावर बेतला? पत्नी अजूनही बेपत्ता, मृतदेहाशेजारील लेडीज शर्टमुळे गुढ वाढले?
शिलाँग – हनीमूनसाठी गेलेल्या जोडप्याचा खून झाल्याची घटना शिलाँगमधून समोर आली आहे. ११ मेला लग्न झाल्यनांतर हे जोडपे हनीमूनसाठी शिलाँगला गेले होते. पण २० मे नंतर त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. आज अखेर पतीचा मृतदेह सापडला असून पत्नी अजूनही बेपत्ता आहे.
राजा रघुवंशी आणि सोनम यांचा ११ मे रोजी विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर २० मे रोजी राजा आणि सोनम दोघेही हनिमुनसाठी शिलाँगला गेले होते. पण २० मे नंतर दोघांचाही घरच्यांबरोबरचा संवाद तुटला होता. त्यामुळे घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांचे शेवटचे लोकेशन शिलाँग दाखवत होते. त्यामुळे पोलीसांनी तिथे शोध घेतला असता त्यांनी भाड्याने घेतलेली स्कुटी सापडली होती. पण दोघेजण बेपत्ता होते. त्या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला आहे. आता पोलिसांची पथकं सोनम रघुवंशीचा शोध घेत आहेत. राजा आणि सोनम फिरायला गेल्यानंतर त्यांनी कॉफी प्यायली आणि केळी खाल्ली. सोनमला कॉफी आवडली नाही. त्यामुळे राजाने दुकानदाराशी वाद घातला होता. त्यामुळे पोलीस दुकानदाराचीही चाैकशी करत आहेत. सोनम सापडल्यावर संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा होणार आहे. दरम्यान राजाच्या मृतदेहाजवळ एक महिलेचा पांढरा टी-शर्ट आणि एक औषध देखील सापडले. टी-शर्ट आणि औषधे सोनमची आहेत की कोणीतरी ती खंदकात फेकली याचाही पोलिस शोध घेत आहेत.
इंदौरच्या राजेंद्र नगर परिसरात राहणारे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी पत्नी सोनम रघुवंशीसोबत हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. दोघेही शिलाँगच्या ओयरा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. ही हत्या आहे की इतर कोणते कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.