
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याची आज पुण्यात घोषणा केली.गॅस आणि इंधनाचे दर कमी करण्यापासून ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच जाहीरनामा ज्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला त्या वंदना चव्हाणही उपस्थित होत्या. यावेळेस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही शरद पवारांनी उत्तर दिलं. तसेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढील 3 दिवसात राज्यात 7 सभा असल्याच्या मुद्द्यावरुनही पवारांनी निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात सध्या सभांचा धडाका लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी चंद्रपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणीत सभा घेतल्या आहेत. आता पुढील 3 दिवसांत मोदी महाराष्ट्रात 7 सभा घेणार आहेत. याचसंदर्भात शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी, “नरेंद्र मोदी यांना भीती वाटते आहे त्यामुळे ते महाराष्ट्रात तीन दिवसात सात सभा घेत आहेत,” असं उत्तर दिलं.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ अशी टीका केली होती. यासंदर्भातही पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी, “त्यांना पराभवाची भिती वाटते. त्यामुछे ते अशा पद्धतीची टीका करत आहेत,” असा टोला लगावला. तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी, ‘मी विकासावर बोलतो. ते मात्र पराभवाच्या चिंतेतून अशापद्धतीने व्यक्त होत आहेत,’ असंही म्हटलं. ‘महाराष्ट्रात बदलाचा मूड दिसत आहे,’ असं सूचक विधान शरद पवारांनी केलं.