पंजाब दि २ (प्रतिनिधी) – देशात महिलांविरुद्ध अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मग तो लैंगिक असो अथवा घरगुती अत्याचार. मात्र, या अत्याचारांमधून लोकप्रतिनिधी सुद्धा सुटले नाही आहे. अशीच एक घटना पंजाबमध्ये समोर आली आहे. मात्र या घटनेची दखल महिला आयोगाने घेतली आहे.
बलजिंदर कौर असे मारहाण झालेल्या महिला आमदाराचं नाव आहे. त्या तलवांडी साबो या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. बलजिंदर कौर या चर्चा करताना या व्हिडिओत दिसत आहे. कौर आणि त्यांचे पती यांच्यात काही मुद्द्यावरून वाद होत आहे. वाद वाढला तेव्हाच त्यांच्या पतीने त्यांना मारहाण केली आहे. घटनेचा व्हिडीओ पंजाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष बरिंदर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याप्रकरणाची पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी दखल घेतली आहे. जी महिला जनतेचे प्रश्न मांडते, तिला स्वतःच्या घरात अशा प्रकारे छळाला सामोरं जावं लागतं हे खूप खेदजनक असल्याचं मत अध्यक्षा मनिषा गुलाटी यांनी व्यक्त केलं आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
बलजिंदर कौर पंजाबच्या तलवंडी साबोच्या आमदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा याच जागेवरून विजयी झाल्या. निवडणुकीत बलजिंदर कौर यांनी काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. केजरीवाल याची दखल घेण्याची शक्यता आहे.