
‘तू माझी बदनामी करुन जिंदगी बरबाद का केली’
तरुणीची चाकूने वार करत हत्या, आरोपी तरुणीचा नातेवाईक, तो आला आणि त्याने.....
हिंगोली- बदनामी का करतेस म्हणत १९ वर्षीय तरुणीची चाकूने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना हिंगोलीत समोर आली आहे. नात्यातीलच तरुणाने चाकूने वार करून ही हत्या केली आहे. या घटनेने हिंगोलीत खळबळ उडाली आहे.
संजना गजानन खिल्लारी असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील तरुणी संजना खिल्लारी ही घराच्या दुसऱ्या मजल्यावर वाचन करत बसली होती. त्यावेळी आरोपी अभिषेक खील्लारी हा तीच्या घरी गेला आणि संजना कुठे आहे अशी विचारणा केली. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी संजना वरच्या मजल्यावर आहे असे सांगितले. अभिषेक थेट वरच्या मजल्यावर गेला आणि “तू माझी बदनामी का केली, तू माझी जिंदगी बरबाद केली”, असं म्हणत संजनावर चाकूने वार केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संजना घाबरली आणि तिने गॅलरीमध्ये येऊन आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत अभिषेक तिला रक्तबंबाळ केले होते. संजनाला तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजना खिल्लारी ही कुटुंबात एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी खून करून पसार झालेला आरोपी अभिषेक खिल्लारी याला अटक केली आहे. आरोपी हा तरुणीचा नातेवाईक आहे. मात्र तरुणीवर इतक्या क्रूर पद्धतीने आरोपीने हल्ला कोणत्या कारणातून केला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.