
पत्नीची प्रियकराच्या मदतीने पतीला वायरने बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, मेरठप्रमाणे ड्रममध्ये घालून मारण्याची दिली धमकी, पतीची पोलिसात धाव
गोंडा – गोंडा जिल्ह्यातील जल निगम विभागात तैनात असलेले जेई धर्मेंद्र कुशवाह यांना पत्नीने ‘तुकडे तुकडे करुन ड्रममध्ये भरेल’, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मूळच्या झाशीचे असलेले धर्मेंद्र कुशवाह हे ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जल निगममध्ये कार्यरत आहेत. त्यांनी पत्नी माया मौर्य आणि तिचा प्रियकर नीरज मौर्य यांच्यावर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कुशवाह यांनी सांगितलं की, २०१६ मध्ये बस्ती जिल्ह्यात राहणाऱ्या माया मोर्य हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. मुलीच्या जन्मानंतर पत्नीच्या नावे तीन चार चाकी गाड्या घेतल्या. त्याचे हफ्ते फेडत राहिलो. तिच्याच नावावर जमीन आणि घर बांधायचं काम तिचा नातेवाईक नीरज मौर्य यांना दिले.याच काळात धर्मेंद्रला आपली पत्नी माया आणि नीरज यांच्यात काहीतरी संबंध असल्याचा संशय येऊ लागला. एक दिवस ७ जुलै २०२४ रोजी, धर्मेंद्र रात्री अचानक जागा झाला आणि त्याने आपली पत्नी माया आणि नीरज यांना शेजारच्या खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. जेव्हा त्याने या गोष्टीला विरोध केला, तेव्हा माया त्याच रात्री नीरजसोबत निघून गेली. यानंतर तिने काही दिवसांनी परत येत धर्मेंद्रला मारहाण केली आणि 15 ग्रॅम सोन्याची साखळी घेऊन पळून गेली. या घटनेनंतर १ सप्टेंबर २०२४ रोजी धर्मेंद्रने आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीने धर्मेंद्रला मारहाण केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
धर्मेंद्रच्या पत्नीने पतीचे आरोप फेटाळले आहेत. चार वेळा गर्भपात करायला लावल्याचं मायाने म्हटलंय. पती-पत्नीतील वाद आधीपासून न्यायालयात सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.