
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या
प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा, बेपत्ता झाल्याचा बनाव या कारणामुळे फसला, काय घडले?
वसमत- अनैतिक संबंधाला पती अडसर ठरत आहे हे पाहून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना कुरुंदा पोलिसांनी अटक केली आहे.
शिवाजी राजाराम पोटे असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. पत्नी मंगल पोटे आणि तिचा प्रियकर ज्ञानेश्वर ठोंबरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात शिवाजी राजाराम पोटे हे एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून कामाला होते. त्यांची पत्नी मंगल, एक मुलगा आणि एक मुलगी असं कुटुंब राहत होतं. त्यांचा मुलगा शिरड शहापूर येथील शाळेमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे मंगल पोटे या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी जात होत्या. तिथेच शाळेत स्वयंपाकी काम करणाऱ्या ज्ञानेश्वर ठोंबरे याच्यासोबत मंगल हिचे सूत जुळले. यांची माहिती शिवाजीला समजल्यानंतर दोघात वाद होऊ लागले. पती अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याने मंगल आणि तिच्या प्रियकराने शिवाजी यांचा काटा काढायचा निर्णय घेतला. त्यानुसार नियोजन करत घटनेच्या रात्री मंगलने प्रियकराच्या मदतीने शिवाजी पोटे याच्या डोक्यात लाकडाने जोरदार वार केला. या जोरदार घावामुळे तो जागीच ठार झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह नाल्याजवळ फेकून दिला. आणि शिवाजी बेपत्ता असल्याचा बनाव केला. पण काही तासानंतर त्यांचे बिंग फुटले.
या प्रकरणी पत्नीला पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर दाट संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी अतिशय शिताफिने तपास करून अवघ्या चार तासात या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.