पुणे : जेवण बनवले नाही म्हणून पतीने पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकून वार करुन जखमी केले. हा प्रकार हडपसर परिसरात झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक येथे गुरुवारी (दि.1) रात्री साडेबाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नमिता श्रावण माने (वय-33 रा. जी एत कॉम्प्लेक्स, झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन श्रावण राम मान (वय-37) याच्यावर आयपीसी 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती कारणावरुन व जेवण बनवले नाही या कारणावरुन आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद सुरु होता. वाद सुरु असताना आरोपी पतीने घरातील कांदा कापण्याच्या चाकूने पत्नी नमिता हिच्या हातावर वार केले. तसेच तिला मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.