‘राष्ट्रवादी मध्येच राहणार, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का’
अजित पवार यांनी मौन सोडले, शिंदेच्या त्या पत्रावर खुलासा, अजितदादा म्हणाले....
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. असे म्हणत भाजपा प्रवेशाचा इन्कार केला.
अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणिवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना मी पाहत आहे. वास्तविक ज्या काही बातम्या चालल्या आहेत आणि ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत त्यात काहीही तथ्य नाहीये. मी नेहमीप्रमाणे माझ्या कार्यालयात बसतो. मंगळवार-बुधवार आमदारांच्या मिटींग असतात किंवा मंत्रालयात कामानिमित्त येत असतात. त्यामुळे आज काही आमदार मुंबईत आले होते ते मला भेटायला आले होते. ही नेहमीची पद्धत आहे. यातून वेगळा अर्थ काढू नका. असेही अजित पवार म्हणाले आहेत. कोणीही काळजी करु नये. आम्ही सर्वजण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आजवर पक्षामध्ये अनेक चढउतार आले आहेत. पण काही नेतेमंडळींनी देखील अशा अफवा पसरवण्याचे काम केले आहे. माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. ४० आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या जनतेपुढे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या महत्त्वाचे प्रश्नांवरुन लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. महत्त्वाचे प्रश्न काय आहेत तर तो बेरोजगारीचा आहे, महागाईचा आहे, अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान आहे, पंचनामे व्यवस्थित होत नसल्याचा आहे, नोकर भरती होत नाहीये. खरेदी केंद्र अनेक ठिकाणची बंद पडत आहेत असेही अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही मानवनिर्मित चूक असल्याने मृतांच्या नातेवाईकांना २० लाख रुपये आणि बाधितांना मोफत उपचारासह ५ लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून दोषींवर सदोष हत्येचा गुन्हा नोंदविण्याची मागणी अजित पवार यांनी पत्राद्वारे शिंदेंकडे केली आहे.