अंगावर कार घालून महिला व अडीच वर्षाच्या चिमुकल्याची हत्या
दोघांची हत्या करुन आरोपी फरार, शेजारच्या सोबत हा वाद ठरला जीवघेणा, घटनेने परिसरात खळबळ
अहमदनगर दि २५(प्रतिनिधी)- जागेच्या वादातून होणारे वाद नवीन नाहीत. पण याच जागेच्या वादातून शेजाऱ्याने अडीच वर्षाच्या बाळासह त्याच्या आईची गाडीखाली चिरडून हत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
शितल येनारे आणि स्वराज येनारे अशी मृतांची नावं असून आरोपी सध्या गायब आहेत. याप्रकरणी किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये येनारे कुटुंब राहत होते. हल्लेखोर आरोपी श्रीमंदिलकर त्यांच्या शेजारी राहत होता. घराच्या शेजारी जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाले होते. घटनेच्या दिवशी शीतल येनारे त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलाला जेवण भरवत बाहेर बसल्या होत्या. त्याच वेळी आरोपी कारने तिथे आला. त्यानंतर त्याने शीतल व स्वराज यांच्या अंगावर कार घातली. यावेळी शीतलच्या सासू चंद्रकला यांनी आरडाओरड केल्याने शेजारचे लोक धावून आले. आणि जखमींना गाडीखालून बाहेर काढले. दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शीतल यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात तर स्वराजला विळद घाटातील विखे पाटील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येनारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. जागेच्या वादात अडीच वर्षाच्या मुलाचा नाहक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच परिसरात बघ्यांची गर्दी वाढली होती.