
महिलेने भरधाव कारने खेळणाऱ्या चिमुकल्याला चिरडले
धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, महिलेची कृती पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!
गाजियाबाद – गाझियाबादमधील राजेंद्र नगर एक्सटेंशन येथील एसजी ग्रँड सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने कारने एका लहान मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे त्या महिलेने आपल्या बेजबाबदारपणाचे देखील दर्शन घडवले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
व्हिडिओ फुटेजमध्ये सोसायटीच्या आवारात अनेक मुले खेळत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याच वेळी सोसायटीमधून एक महिला कारमधून जात असते आणि जात असताना तिने तिथे खेळत असलेल्या एका चिमुकल्याच्या अंगावरुन कार नेते,मात्र इतर चिमुकल्यांनी तिला सांगून कार थांबवली जाते.सर्व घटनेत चिमुकल्याला बाहेर काढण्यात येते.धक्कादायक म्हणजे महिला कार मधून उतरुन संपूर्ण प्रकार पाहते आणि परत कारमध्ये बसून निघून जाते. ती त्या मुलाला दवाखान्यात देखील घेऊन जाण्याचे साैजन्य दाखवत नाही. विशेष म्हणजे ती महिला त्या सोसायटीतील कोणाकडे तरी पाहूणी म्हणून आलेली होती. पण ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना नंदग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते, पण अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मुलावर उपचार सुरु आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे.
तातडीने पोलिस कारवाई न केल्याबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर रुपेश वर्मा यांनी महिलेला कायदेशीर परिणामांपासून वाचवण्यासाठी सोसायटीच्या नोंदणीवहीतील पाने फाडल्याचा आरोप केला आहे.